Sanjay Raut On Devendra Fadnavis : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात सरकारवर सातत्याने दबाव वाढत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असणार्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी केले जावे, तसेच कराडवर मकोका लावला जावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. या आणि इतर मागण्यांसाठी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी आंदोलन करावं लागत असल्याच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीका केली आहे.
वाल्मिक कराड याला वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात असल्याचा आपोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस यांना सांगितंल आहे की कोणालाही सोडणार नाही, म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करून कारवाई करेन… वाल्मिक कराड आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय नातं आहे? याच्या तपासासाठी एखादी एसआयटी नेमावी लागेल. कोणासाठी देवेंद्र फडणवीस हे करत आहेत, पाठीशी घालत आहेत हा एक रहस्याचा विषय आहे. कोणाला वाचवत आहेत? अजित पवार यांना वाचवत आहेत की, त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवत आहेत? की अजून काही रहस्य आणि गुपित आहे?” अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली.
“त्यांनी(देवेंद्र फडणवीस) एक एसआयटी बरखास्त करून नवीन नेमली. आता वाल्मिक कराड यांना फडणवीस का वाचवत आहेत? याच्या तपासासाठी वेगळी एसआयटी नेमली पाहिजे”, असेही संजय राऊत म्हणाले.
एसआयटीमध्ये काही महत्त्वाचे बदल
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात काही महत्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालीच नवीन पथक काम करणार आहे. यापूर्वीच्या एसआयटीमधील काही अधिकाऱ्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. एका पोलिसाबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे परस्परांच्या खांद्यावर हात असणारे छायाचित्र माध्यमांमध्ये पसरले होते.
नवीन विशेष तपास पथक (एसआयटी)
किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, सीआयडी, छत्रपती संभाजीनगर), अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक अन्वेषण विभाग, बीड), सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक, बीड), अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, सीआयडी, पुणे), शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, सीआयडी, पुणे), दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, सीआयडी, पुणे)