Shivsena UBT on Eknath Shinde & Kunal Kamra : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे. ज्या ठिकाणी कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला, जिथे त्याने कविता सादर केली त्या मुंबईमधील खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या ताब्यात घेतलं होतं. त्यापाठोपाठ आणखी २० जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात स्टुडिओमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावरून शिंदे गटाला व त्यांच्या कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “एकनाथ शिंदेवर टिका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोललं गेलं, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचं हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरतं मर्यादित आहे का?

कुणाल कामरांच्या कवितेतील एकही शब्द दुखावणारा नव्हता : विजय वडेट्टीवार

पाठोपाठ काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. वडेट्टीवर म्हणाले, “कुणाल कामरा यांच्या या कवितेत एकही शब्द दुखावेल असा नव्हता. त्यांनी वस्तुस्थिती मांडली, तरी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली. सत्ताधाऱ्यांनी टीका सहन करायची तयारी ठेवली पाहिजे. राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का?”

शिवसेना (शिंदे) कुणाल कामराविरोधात आक्रमक

कुणाल कामरा याने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली. त्याचबरोबर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले. राहुल कनाल यांनीही कुणाल कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.