संपूर्ण सरकारला जनता बाय बाय सरकार म्हणतं आहे. या सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच काही घोषणा होऊ शकतात. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो. त्या अनुषंगाने ज्या योजना किंवा घोषणा असतात त्याची आर्थित तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस असेल पण तो गाजर संकल्प असणार आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. घोषणा आजवर खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमच झालं आहे. दोन वर्षांत ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली हे खरेपणाने सांगावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचताराकिंत शेती करतात म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

महागळती सरकार राज्यात आहे

या सरकारला खोके सरकार, महायुती सरकार म्हणतात. पण केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार म्हणजे महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे. पेपरही फुटत आहेत. आम्ही प्रश्न मांडले की आमच्यावर आरोप होत आहेत. आमच्याकडून काही प्रश्न उपस्थित केले जातीलच. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपल्याच माध्यमांतून आम्हाला समजतं आहे. राज्यातले शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे.

अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री त्यांच्या शेतात वेगळंच पीक काढतात

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच हे जाहीर केलं होतं. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं ठीक आहे कारण त्यांची शेती पंचतारांकित आहे. हेलिकॉप्टरने जाणारे ते एकमेव शेतकरी आहेत. अमावस्या, पौर्णिमेला वेगळं पिक मुख्यमंत्री काढतात असंही कळलं आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे पण वाचा- “खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “उद्या अधिवेशनात…”

शेतकऱ्यांना कुणीही वाली राहिलेला नाही

विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कुणी वाली राहिलेला नाही. १० हजार २२ कोटींची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत. शेतकऱ्यांच्या हातात किंवा खात्यात पैसे येणं बाकी आहे. जानेवारीपासून १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही ठिकाणी फक्त ७० रुपये जमा झाले आहेत. उद्याच्या अधिवेशनात डबल इंजिन सरकार आलेलं आहे. एनडीएचं सरकार हे दुर्दैवाने देशावर आलं आहे. आता डबल इंजिन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. आता जाहीर मागणी आहे की तुमच्या थापा खूप झाल्या, घोषणा खूप झाल्या. अजूनही साडेतीन महिने आहेत. तुम्ही निवडणुकीच्या आत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करा. फडणवीसांच्या काळात कर्जमुक्तीची घोषणा झाली. ती अद्याप सुरु झाली ती योजना पूर्णच झाली नाही असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. आता नुसत्या घोषणा नकोत, अंमलबजावणी करा. आधी योजनांची अंमलबजावणी करा मग निवडणुकीला सामोरे जा असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय.

डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा. या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका. कर्ता पुरुष असतो तसं अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते. चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले. तसंच मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलं होतं ती योजना पोकळ ठरली आहे. आता लोकांची सहनशक्ती संपली आहे. गाजर दाखवून तुमचं काम होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.