मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणा दांपत्याचा अमरावतीमधील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच अडवले. दरम्यान शिवसेना नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर आव्हान दिलं आहे.

“मुख्यमंत्र्यांवर बोलणं ही सध्या फॅशन झाली आहे. त्याच्यामुळे टीआरपी वाढतो आणि प्रसारमाध्यमंदेखील त्यांच्या मुलाखती घेतात. ज्यांचं अस्तित्व नष्ट झालं आहे, जे अनेक पक्ष फिरुन आले आहेत त्यांनादेखील एक मंच मिळतो. माझं तर आव्हान आहे की, मातोश्री दूर राहिलं, अमरावतीच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावी. ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी. तर त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे,” असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

“मातोश्री हा फार मोठा पल्ला अजून त्यांना गाठायचा आहे. लोकप्रतिनिधी झाल्यानतंर राजकीय संस्कृती पाळावी. राजकीय संस्कृतीच नसेल तर त्यांच्यावर बोलण्याचा मला काही अधिकार नाही आणि त्यांना तितकं महत्वही देऊ नये. मातोश्रीवर येणं फार सोपं वाटत असेल तर त्यांनी आजमून पहावं,” असं आव्हान उदय सामंत यांनी राणे दांपत्यांनी दिला.

“शाखा प्रमुख पण सोडा, गटप्रमुखाचं घर निवडावं आणि त्याचे परिणाम पहावेत. अशा वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असून जाती-धर्मात तेढ निर्माण होत असल्याची दखल गृहविभागाने घेतली पाहिजे,” असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

“राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार”

“मला वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यामध्ये काहीही शंका नाही. कारण तुम्ही तुमची विचारधारा सोडलेली आहे पण बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची शिकवण सोडलेली नाही. त्याला धरुनच ते प्रत्येक गोष्टीत लढत आहेत,” असं नवनीत राणा यांनी टीव्ही९ सोबत बोलताना म्हटले आहे.

Story img Loader