उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर पुण्यात आजपासून सुरु झालेले कॉलेज आज बंद होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत कॉलेज सुरु न करण्याची भूमिका अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याची घोषणा करणाऱ्या अजित पवारांच नाव न घेता टोला लगावला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कॉलेज सुरु होतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
“पुण्यात जो काही गोंधळ झाला आहे तो एक-दोन कॉलेजमध्ये झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री या नात्याने तिथे बैठक घेतली होती. कॉलेज सुरु झाली पाहिजेत अशी त्यांची इच्छा असून तशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. उद्या यासंदर्भात सर्व कुलगुरुंशी चर्चा करुन मी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत कॉलेज कधी सुरु करायचे? एसओपी काय असेल? अभ्यासक्रम, हजेरी यासंबंधी निर्णय घेणार आहोत. करोनाच्या स्थितीचा आढावा घेऊनच सर्व निर्णय घेणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“करोना कमी झाला असून कॉलेज सुरु करण्यास काही हरकत नाही अशी सर्वांची भूमिका आहे. काल मला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत असं म्हटलं आहे. उद्या त्यांचीदेखील मी भेट घेणार आहे. येत्या दोन दिवसांत कॉलेज कधी सुरु होतील याचा निर्णय घेतला जाईल,” असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान समन्वयाचा अभाव होता का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्या कॉलेजची नावं समोर येत आहेत त्यांच्याकडे स्वायत्तता आहे. त्यामुळे त्यांनीदेखील सुरु करताना विचारणा करणं गरजेचं होतं. पण त्यांचा यात दोष आहे असं मी मानत नाही. कदाचित संभाषणाचा अभाव असेल. पण उपमुख्यमंत्र्यांनी केलेली सूचना आम्ही तंतोतंत पाळत आहोत. आम्ही आजपर्यंत कोणताही आदेश किंवा जीआर काढलेला नाही. तो लवकरच काढणार आहोत. गरज लागल्यास विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सोयदेखील उपलब्ध करणार आहोत. कॉलेज सुरु करायची आहेत, पण घाई करुन मी सर्वात पहिलं सुरु केलं या अविर्भावात कोणी सुरु करु नये. शेवटी आपल्याला विद्यार्थी आणि पालकांची चिंता आहे”.