लोकं आमच्यासोबत आहेत, ती राहतील. ज्या कुणाच्या खिशात आणि घशात पक्ष कोंबला आहे त्यांना लवकरच ठसका लागेल तसंच रावणाने हाती धनुष्यबाण घेतला तरीही तो छाताडावरच पडणार असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा आणि एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे. कणकवलीत संजय राऊत आले होते तिथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्हीही भरारी घेऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय संजय राऊत यांनी?

“मी कालपासून कोकणात आहे. काल कणकवलीत आलो. कोकणात शिवसेना जागच्या जागी आहे. इथेही आपण पाहात आहात काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगामधल्या पोपटरावांनी परस्पर ठरवलं की शिवसेनेची मालकी कुणाकडे द्यायची. त्यानंतर कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी लगेच काही लोकं गेले. वृत्तपत्रात फोटो पाहिले जल्लोष लिहिलं होतं. मोजून सात चेहरे होते. त्यात एक अब्दुला नाचत होता. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते फटाके उडवत नाचत आहेत. अशा लोकांनी शिवसेना वाढणार नाही.”

लोकं सोशल मीडियावर खूप चांगल्याप्रकारे वक्तव्य करत आहेत. पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे तुम्ही कितीही पाट्या पुसल्या तरीही रावण काही धनुष्यबाण पेलू शकणार नाही तो छाताडावरच पडणार. आता देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी जे विरोधात बसले आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. एक पक्ष पन्नास वर्षे उभा आहे. एक पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्यातले काही आमदार आणि खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले म्हणून पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्या मालकीचं कसं होऊ शकतं? हे आता प्रत्येकाने विचारण्याची गरज आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन दिवस फटाक्यांची आतषबाजी होईल. त्यासाठीही खोक्यांचा हिशेब झालाच असेल असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी स्पष्ट केलं आम्ही अजिबात खचलेलो नाही. वेदना तर नक्की झाली पण कुणीही खचून गेलेलं नाही. पक्ष जागेवर आहे आणि लोकं आमच्यासोबत आहेत. आज मी आव्हान देतो निवडणुका घ्या शिवसेना कुणाची याचा फैसला लोकच करतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader