गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये देखील येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. त्यातही राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेमकी कुणाला पाठिंबा देणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात होतं. शिवसेनेच्या काही खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पक्षानं पाठिंबा द्यावा, अशी मागणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार? यावर चर्चा सुरू झाली होती. त्यावर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे भूमिका मांडली आहे.
“गेल्या ४-५ दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यात एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जि.प. अध्यक्षा आल्या होत्या. एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केली आहे की पहिल्यांदा आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे”, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
“खासदारांच्या बैठकीत कुणीही…”
दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना खासदारांच्या बैठकीबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या असून त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “राष्ट्रपतीपदाची निवडणूक समोर आली आहे. मी मुद्दाम स्वत: तुमच्यासमोर बसलोय कारण काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की काल खासदारांच्या बैठकीत कुणीही माझ्यावर दबाव आणलेला नाही. सगळ्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला आहे. आजही मातोश्रीवर रीघ लागली आहे. त्यात मी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे. खासदारांसोबतही चर्चा केली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
द्रौपदी मुर्मू कोण आहेत? पाहा व्हिडीओ –
मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा ठरत नाही – संजय राऊत
“खरंतर मी विरोध करायला हवा होता, पण..”
“हा पाठिंबा देण्यामागे कुणाचाही दबाव नाही हे मी पुन्हा सांगतोय. खरंतर सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी विरोध करायला हवा होता. पण शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी कधीच कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताईंना देखील शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला होता. त्यालाच अनुसरून मी लोकांनी केलेल्या आग्रहाचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर करतोय”, असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.