Sachin Ahir in Shivsena UBT Pune Meeting Alliance with Congress : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की दिल्लीच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही. हरियाणा व महाराष्ट्राच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचं नुकसान होऊ लागलं आहे. आता शिवसेना (ठाकरे) देखील काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली. अशातच शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी देखील तशीच मागणी केली आहे. पुण्यात आज शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून आम्हाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सर्वांच्या मागण्या आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडू. त्यानंतर उद्धव ठाकरे देतील त्या सूचनेनुसार आम्ही मार्गक्रमण करू.
सचिन अहिर म्हणाले, “आम्ही आज पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विभागनिहाय चर्चा केली. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं. यावेळी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की आगामी निवडणुका आपण स्वबळावर लढवायला हव्यात की महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुकांना सामोरं जायला हवं? यावेळी बरेच पदाधिकारी म्हणाले की आपण आगामी निवडणूक स्वबळावर लढवली पाहीजे. तर बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणाले की आपण ही महाविकास आघाडी केली आहे. ती कायम ठेवली पाहिजे. आपण महाविकास आघाडी म्हणून आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जायला हवं”.
हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका
सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना (ठाकरे) नेते म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही एका बाजूने बहुमत दिलं नाही. त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काही तालुक्यातील पदाधिकारी म्हणाले की आपण स्वबळावर निवडणूक लढवू, तर काहींचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (शरद पवार) महाविकास आघाडी केली आहे, ती टिकवली पाहिजे, जपली पाहिजे. सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आम्ही त्यांच्याकडे या सर्व बैठकांचा अहवाल देऊ. त्यानंतर ते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. त्यांच्या निर्णयाची संपूर्ण जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी केली जाईल.