शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्टला हिंगोलीतील रामलीला मैदानावर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता ‘गद्दार दादुल्या’ म्हणत सडकून टीका केली आहे.
अयोध्या पोळ म्हणाल्या, “कळमनुरी विधानसभेचा गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडीओ मला पाठवत आहेत. गद्दारांसह सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे. कारण जो बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रँड आहे. त्यांना मार्केटिंग व बॅनरबाजीची गरच नाही हे लक्षात ठेवा.”
“उद्धव ठाकरे या २४ कॅरेट अस्सल ब्रँडचं मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघोषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरतेय. तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या? हिंगोलीत स्वयंघोषित महाशक्तीचा बाप येतोय बाप,” असं म्हणत अयोध्या पोळ यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.
“माझा संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी?”
दरम्यान, याआधीही अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना त्यांच्याच एका आव्हानाची आठवण करत “मिशा कधी काढणार?” असा खोचक सवाल केला होता. संतोष बांगर यांनी अयोध्या पौळ यांना जाहीर आव्हान दिलं होतं. अयोध्या पौळ यांनी संजय बांगर यांचा उल्लेख गद्दार असा केल्यानंतर त्यांनी टीका करताना आव्हान दिलं होतं.
“आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल, तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही घाबरणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं बांगर म्हणाले होते.