राज्यात अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी गटातील महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळातही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान मोदींचं नाव घेत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ आलाय”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना ठाकरे गटाकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘मिंधे’ असा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना उद्देशून केलेल्या टीकेवर भाष्य करण्यात आलं आहे. “मुख्यमंत्री मिंधे यांचा लाळघोटेपणा टोकाला गेला आहे व त्या टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला. मोदींनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठिशी घातले असा मोघम आरोप काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी करताच मुख्यमंत्री मिंधे यांच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. आपण भाजपाचे पुढारी नसून नकली का होईना, पण शिवसेनेचे नाव लावून राजकीय दुकान चालवतो याचा त्यांना विसर पडला”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“मिंधे यांच्या स्मरणशक्तीचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. मोदी यांचा लाळघोटेपणा करताना मिंधे सांगतात, ‘१० वर्षांत पंतप्रधान मोदींवर एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाही. काँग्रेस नेत्यांनी खूप प्रयत्न केले, पण मोदींवर घोटाळा केल्याचा आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत’. मिंधे यांचे हे विधान गंमतीचे आहे. महाराष्ट्रात मिंधे यांच्या नेतृत्वाखाली एक घटनाबाहय़ सरकार मोदीकृपेने चालवले जात आहे हाच एक मोठा घोटाळा आहे”, असा टोलाही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे.

“कट, कमिशन, भ्रष्टाचार व दहशतवाद हे भाजपाचे सूत्र”

“ईडी, सीबीआयच्या कारवाया करू व तुरुंगात टाकू, अशा धमक्या देऊन मोदी व त्यांच्या पक्षाने शेकडो कोटींचा निधी उकळला याला सोमनाथ, काशी मंदिरातून मिळालेले दान समजायचे काय? कट, कमिशन, भ्रष्टाचार व दहशतवाद याच सूत्रातून सध्याची भाजपा सुजली आहे. देशाला सगळ्यात जास्त रोजगार देणाऱ्या पब्लिक सेक्टरची विक्री मोदी यांच्या मित्रांना झाली. अत्यंत स्वस्तात हा व्यवहार झाला व हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे”, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.

“तुमची चार माकडं…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल; थेट नामोल्लेख करत म्हणाले…

“महाराष्ट्रावर लाखो कोटींचे कर्ज चढले असताना मिंधे हे ठेकदारांच्या फायद्यासाठी चढ्या भावाने ‘टेंडर’ काढत आहेत. समृद्धी महामार्गापासून ते कोस्टल रोडच्या कामापर्यंत फक्त कट-कमिशनच आहे. त्यामुळे मिंधे म्हणतात ते खरेच आहे. मोदी यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही असे मिंधे म्हणत असले तरी देशाच्या जनतेनेच मोदी यांचे बहुमत घालवून मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमवत आहेत हे सिद्ध केले आहे”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.

“मोदी यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व लोक आज ‘टीम मोदी’मध्ये सुखाने नांदत आहेत. मिंधे व त्यांचे लोकही त्यात सामील आहेत. त्यामुळे मिंधे यांचा लाळघोटेपणा हा त्यांच्या मजबुरीतून आला आहे”, असा टोला ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray faction slams cm eknath shinde pm narendra modi pmw
Show comments