खारघर येथे झालेला १३ श्री सेवकांचा मृत्यू सरकारी बेफिकिरी व राजकीय लोभामुळे झाला. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? आप्पासाहेबांना दिलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’मुळे जो आनंद झाला, त्यास गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्री व त्यांच्या अति फाजील टोळीने केले. १३ श्री सेवकांचा बळी घेणे हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात बसते. मुख्यमंत्री अयोध्येत जाऊन आले. तेथून संयम शिकले नाहीत व आप्पासाहेबांकडून मानवता शिकले नाहीत, अशी टीका शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“या मंडळींनी ज्यांना गुरू मानले आहे, त्या गुरूंचाही मानवतेशी संबंध नाही. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे आप्पासाहेबांनी तळमळीने सांगितले. पण, मानवतेच्या बाबतीत उदासीनता दाखविणारे मंचावर होते. सूर्य त्यामुळेच जास्त कोपला असावा,” असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठे जाणार नाही मात्र शंभर टक्के शिंदे-फडणवीस सरकार पडणार; आमदार शशिकांत शिंदेंचा दावा

“…त्यांच्या शब्दकोशात ‘मानवता’ शब्द आहे काय?”

“आप्पासाहेबांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना जे निरूपण केले. त्यापासून सरकारने बोध घेणे गरजेचे आहे. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे आप्पासाहेबांनी सांगितले, पण जे खारघरच्या व्यासपीठावर थंड सावलीत ‘व्हीआयपी’ म्हणून बसले होते, त्यांना तळपत्या उन्हात बसलेल्या श्री सेवकांबद्दल मानवता असती तर त्यांच्याही डोक्यावर छप्पर घालून सोहळा पार पाडला असता. पुन्हा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला, त्यांच्या शब्दकोशात ‘मानवता’ शब्द आहे काय?,” असा सवाल ठाकरे गटाने अमित शाहांना विचारला आहे.

“गर्दीत त्यांना मानवता कमी व…”

“आप्पासाहेबांच्या विचारांची पारायणे करावीत व स्वतःचे पाप धुऊन काढावे असे काही लोक मंचावर होते. त्यांना आप्पासाहेबांच्या विचारांपेक्षा आप्पासाहेबांमुळे जमलेल्या अफाट गर्दीचा लोभ होता. या गर्दीत त्यांना मानवता कमी व मतेच जास्त दिसली. त्याचाच फटका शेवटी बसला व समोरील भाबड्या जिवांचा बळी गेला,” असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

“या आगीत जे मरण पावले, त्यांचा दोष काय?”

“अमित शहा यांना संध्याकाळी येण्यास वेळ नव्हता. म्हणून दुपारीच उत्सव केला. प्रमुख पाहुण्यांची ‘सोय’ म्हणून सोहळा भर दुपारी केला खरा, परंतु पाहुण्यांसाठी विशेष थंड मंडप घातला गेला व श्री सेवक मात्र उन्हात शरीर भाजत बसले. आता या आगीत जे मरण पावले, त्यांचा दोष काय? मग सरकारच्या कर्त्याधर्त्यांवर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको काय? मंचावर जे सरकार म्हणून उपस्थित होते ते सगळेच या दुर्घटनेचे अपराधी आहेत,” असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा : “काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”

“विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांनी…”

“देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असते तर ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकर्त्यांसह घुसून ठाण मांडून बसले असते आणि मुख्यमंत्री व आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेऊनच उठले असते. विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांनी हाच पवित्रा घेणे गरजेचे आहे,” अशी भावनाही ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray group attacks cm eknath shinde after death heatstrock ssa