गेल्या काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून मुंबईसह राज्यभरातलं राजकीय वातावरण तापलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासमोर भाजपानं उमेदवार उभा केला होता. मात्र, अंतिम क्षणी भाजपानं उमेदवारी मागे घेतल्यानंतर नव्याने दावे केले जाऊ लागले. एकीकडे पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते वैभव नाईक यांच्या चौकशीचा मुद्दा तापू लागला आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज ठाकरे गटाकडून कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
“चित्रा वाघ आता कुठे आहेत?”
संजय राठोड यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद दिल्यावरून भास्कर जाधवांनी टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या मागे संजय राठोड असल्याचं भाजपाकडून सातत्याने रान उठवलं गेलं. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टीव्हीसमोर यायच्या. “उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायाची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या”, असं म्हणायच्या. आज चित्रा वाघ कुठे आहेत? आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“५ वर्ष फडणवीसांचं सरकार होतं, तेव्हा..”
यावेळी भाजपाला लक्ष्य करताना भास्कर जाधव यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेचा उल्लेख केला. “अनिल देशमुख गेल्या २० महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर आरोप लावला की ते दाऊदनं केलेल्या बॉम्बस्फोटात सगभागी होते. त्यानंतर नवाब मलिक अनेकवेळा निवडून आले. मंत्री झाले.५ वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. पण तेव्हा ते त्यांना बॉम्बस्फोटातले आरोपी म्हणून वाटले नाहीत”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“आज हे सांगतात की तुम्ही बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्या मांडीला मांडी लावून बसले होते. ते ४० गद्दारही असं सांगतायत. पण २०१९ साली भाजपानं राष्ट्रवादीसोबत शपथ घेतली. कदाचित अजित पवार जर परत आलेच नसते, शरद पवारांनी कानाडोळा केला असता, तर हे त्याच नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून त्या मंत्रीमंडळात बसले असते. त्यावेळी त्यांना नवाब मलिक भ्रष्टाचारी दिसले नसते. बॉम्बस्फोटातील आरोपी दिसले नसते. अनिल देशमुख भ्रष्टाचारी दिसले नसते”, असंही भास्कर जाधवांनी यावेळी म्हटलं.