चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत बोलताना भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर असभ्य भाषेत टीका केली होती. काँग्रेस हा भाऊ-बहिणीच्या नात्याला गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष आहे, असे वर्णन त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेधही करण्यात येत आहे. या विधानावरून आता ठाकरे गटानेही मुनगंटीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नेमकं काय म्हटलंय ठाकरे गटाने?
“भाजपा हा एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष आहे. मोदी ज्या मंचावर होते त्याच मंचावरून चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यासंदर्भात अत्यंत घाणेरडे भाष्य करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. मोदी यांच्यासमोर हे घडले, पण एरवी विरोधकांवर घसरणारे मोदी त्यांच्या उमेदवारांच्या बेताल बोलण्यावर गप्प बसले, जसे ते स्वपक्षाच्या निवडणूक रोखे भ्रष्टाचारावर तोंडास पट्टी बांधून गप्प बसले आहेत. मोदी व त्यांचे लोक देश बरबाद करीत आहेत व या बरबादीस रोखण्याचे कर्तव्य महाविकास आघाडीस पार पाडायचे आहे”, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.
हेही वाचा – काँग्रेसवर टीका करताना वनमंत्री मुनगंटीवारांची जीभ घसरली, समाजमाध्यमांवर ट्रोल
‘नकली शिवसेना’ म्हणणाऱ्या मोदींनाही दिले प्रत्युत्तर :
दरम्यान, याच सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता, यावरून ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “मोदींनी काल चंद्रपुरात येऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून त्यांच्या चरणाशी जोडे पुसायला बसलेल्या मिंधे यांची शिवसेना खरी व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी आहे, असे म्हटले. मोदी यांचे हे विधान म्हणजेच त्यांच्या मनातील निराशेचा उद्रेक आहे. शिवसेना फोडूनही उद्धव ठाकरे यांच्याच मागे महाराष्ट्र व मराठी जनता आहे, हे नैराश्य त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. मोदी यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी भय आहे. त्यांच्या बोलण्यातून ते भय दिसते. असली व नकली याचा फैसला महाराष्ट्राची जनता करेल”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Raj Thackeray Supports Mahayuti : राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भा…
“देशात मोदींच्या जुमलेबाजीविरुद्ध वातावरण”
“देशात मोदींच्या जुमलेबाजीविरुद्ध वातावरण बनले आहे. मोदी यांचा करिश्मा वगैरे असल्याचे बोलले जाते ते खरे नाही. प्रचंड पैसा व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून ते स्वतःचा प्रचार करतात. त्यांनी भाडोत्री भगतगण निर्माण केले आहेत व त्यांच्या माध्यमातून ते मोदीनामाची भजने गाऊन घेतात. असे टाळकुटे त्यांनी सर्वत्रच निर्माण केले व हीच मोदींची ताकद आहे. महाराष्ट्रात ढोंग चालत नाही व मोदींचे महाराष्ट्रातील राज्य म्हणजे ढोंगच ढोंग आहे. सगळय़ा बेइमान लोकांना एकत्र करून मोदी महाराष्ट्रात राज्य करीत आहेत”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली.