राज्यात एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सुंदोपसुंदी चालू असताना दुसरीकडे ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामनाही रंगताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण सध्या तापत असून त्यासंदर्भात आधीच्या मविआ सरकारबाबत फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या उल्लेखांवरूनही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हा मुद्दा राजकारणाचा विषय ठरत असतानाच त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे.
संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्राला मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री लाभले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांत टीका केली. मात्र, असं म्हणतानाच संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारची टिप्पणी केली आहे.
“फडणवीसच राज्याचे खरे सूत्रधार”
“देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आहेत. पण राज्याचे खरे सूत्रधार तेच आहेत. राज्य तेच चालवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार. असे प्रश्न विचारल्याबद्दल केंद्रातलं सरकार विरोधकांना तुरुंगात टाकतं. अशीच त्यांचीही इच्छा असेल तर त्यांनी टाकावं आम्हाला तुरुंगात. आम्ही प्रश्न विचारत राहू”, असं संजय राऊत म्हणाले.
“राज्यात सध्या जी अस्वस्थता, खदखद आहे, ती देवेंद्रजींनी समजून घेतली पाहिजे. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. अशावेळी गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्याबरोबरच्या गुन्हेगारांचा बचाव करावा लागतो. जे सत्तेत बसले आहेत. आणि हे आमच्या प्रिय देवेंद्रजींकडून अपेक्षित नाही”, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.
“ही फडणवीसांची मजबुरी आहे की…”
“आम्ही त्यांच्याबरोबर पाच वर्षांची राजवट पाहिली आहे. त्यांचं प्रशासन पाहिलं आहे. पण ते देवेंद्र फडणवीस आम्हाला आता दिसत नाहीत. म्हणून आम्ही म्हटलं की काय होतास तू काय झालास तू. ही त्यांची मजबुरी आहे. त्यांचे हात दगडाखाली आहेत. ते काढताही येत नाहीत आणि ठेवताही येत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे”, असंही राऊत म्हणाले.
“अमृता फडणवीसांचं ब्लॅकमेलिंग हा कौटुंबिक विषय”
“हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. भाजपाला जशी कुटुंबात घुसण्याची सवय आहे तशी आम्हाला नाही. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर काही संस्कार आहेत. पण जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंगचं प्रकरण पोहोचलं असेल, तर ते गंभीर आहे. सध्या ते महाविकास आघाडीत काय झालं त्याचीच गुळगुळीत टेपरेकॉर्ड वाजवत आहेत. आमच्यावर टीका करताना त्यांच्याकडेही काही बोटं आहेत. मला तोंड उघडायला लावू नका”, असा इशाराही संजय राऊतांनी दिला.
राजीनामा दिलेले सरकार परत कसे आणणार? – सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
“आहो तुमचा काळ कधी येणार?”
“रोज महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडतो. पण देवेंद्रजी काही करू शकत नाहीत. आमदार, खासदारांना धमक्या येत आहेत. हे त्यांच्या डोळ्यांसमोर घडतंय. आणि परत काही झालं की विरोधकांवर आरोप करायचे. आहो तुम्ही सत्तेत आहात ना? मोदी तिकडे काँग्रेसचा ६० वर्षांचा काळ सांगतात आणि तुम्ही इथे आमचा अडीच वर्षांचा काळ सांगतात. तुमचा काळ कधी येणार?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.