सोमवारी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी प्रवेश केला नाही, असं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं. पण, भूषण देसाईंच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुंळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत. परंतु, भूषण देसाईंचा शिवसेनेसाठी काहीही हातभार नव्हता. सात-आठ वर्ष सुभाष देसाई मंत्री असताना भूषण देसाईंनी आपल्या दृष्टीने एमआयडीसी चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवसैनिकांची कामं केली नाहीत. याच्या तक्रारीही उद्धव ठाकरेंकडे केल्या होत्या,” असं वैभव नाईकांनी सांगितलं.
हेही वाचा : फेसबुक लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता, मग तो डिलीट का केला? ठाकरे गटाच्या नेत्याचा शीतल म्हात्रेंना सवाल
“भूषण देसाईंबद्दल काही तक्रारी दाखल झाल्या असतील. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आला असेल. या दबावाला घाबरून भूषण देसाईंनी शिवसेना सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असेल,” असेही वैभव नाईक म्हणाले.
हेही वाचा : सुभाष देसाईंच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश का केला?, स्वत: सांगितलं कारण; म्हणाले…
“भूषण देसाईंनी आठ वर्ष आपल्या वडीलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा घेतला. पक्षासाठी त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशीच प्रवृत्ती शिंदे गटात जात आहे. यामुळे शिवसेनेला कोणाताही फरक पडणार नाही. परंतु, अशा प्रवृत्तींमुळे नेत्यांनीही अधिक दक्ष राहायला पाहिजे,” असे आवाहन वैभव नाईक यांनी केलं आहे.