काँग्रेस राजवटीत अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात मशाल पेटवली तेव्हा सभ्य आणि सुसंस्कृत मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते व त्यांनी आघाडीचे सरकार मोठ्या कसरतीने चालवले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उभारलेल्या लढ्यात तेव्हा देश अण्णांच्या मागे उभा राहिला. ‘अण्णा, आगे बढो’ अशा घोषणा तेव्हा तरुणांनी दिल्या. अण्णांचे आंदोलन हे भ्रष्टाचाराविरुद्ध, हुकूमशाहीविरुद्ध होते व आज पुन्हा एकदा त्याच मशाली पेटवण्याची गरज देशात निर्माण झाली आहे. मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले. म्हणून आशेचे दिवे पुन्हा पेटले, इतकेच! अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या! पेटवा ती मशाल, अशी मागणी शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’तून केली आहे.
“अण्णा हजारे यांनी अचानक अशी मागणी केली की, मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना फाशी द्यावी. मणिपूरचे प्रकरण गंभीर आहे व सरकारने त्याबाबत चालढकल करू नये, असे अण्णांचे म्हणणे आहे. अण्णांचे काहीच चुकले नाही. अण्णा जागे आहेत व त्यांचे देशातील घडामोडींवर लक्ष आहे हे यामुळे दिसले. मणिपूरच्या नग्नसत्यावर सारे जग थुंकते आहे; पण त्याची पर्वा ना आपल्या पंतप्रधान मोदींना, ना त्यांच्या बकध्यान करणाऱ्या सरकारला. त्यामुळे इतक्या दिवसांनी जागे होऊन अण्णांनी काय मिळवले?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंच्या काळात आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी..”, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
“अण्णांच्याच कृपेने दिल्लीतील आजचे मोदींचे सरकार स्थानापन्न झाले”
“देशभरातील भ्रष्टाचारी, बलात्कारी, विनयभंगवाले यांना भाजपात प्रवेश दिला जातोय. अण्णा हजारे यांनी आवाज उठवायचा आहे तो इथे; पण सभोवती अन्यायाची व भ्रष्टाचाराची आग लागली असताना अण्णा गप्प होते व आहेत. अण्णांच्याच कृपेने दिल्लीतील आजचे मोदींचे सरकार स्थानापन्न झाले. अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जंतर मंतर रोड, रामलीला मैदानात उपोषणाचा बार उडवून देशाला जागे केले व त्याच जागे झालेल्या मतदारांनी काँग्रेसचा पराभव केला व भाजपास सत्तेत आणले; पण भाजप सरकारचा कारभार असा चालला आहे की, आधीची काँग्रेसची राजवट ही नीतिमान व चारित्र्यवान वाटावी. अण्णांनी भाजपाचे सरकार बसवले व ते राळेगणसिद्धीत जाऊन बसले ते बसलेच,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
“खोकेबाजीवर अण्णा उसळून उठले असते बरे झाले असते”
“‘राफेल’पासून अदानीपर्यंत लाखो कोटींची लूट मोदी सरकारने केली. महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, घोटाळ्यांचे आरोप प्रत्यक्ष पंतप्रधान मोदींनी केले ते सर्व घोटाळेबाज आज महाराष्ट्राच्या सत्तेत सामील आहेत. महाराष्ट्रातील आमदार व खासदार पन्नास-पन्नास खोक्यांना विकले गेले. या खोकेबाजीवर अण्णा उसळून उठले असते बरे झाले असते. पण, आजपर्यंत तरी तसे झालेले नाही. असे तर नाही की, भारतीय जनता पक्षाला अण्णांनी वरदान दिले आहे? तुम्ही हवा तितका भ्रष्टाचार करा. मी तुमच्या घोटाळ्यांकडे अजिबात पाहणार नाही. भाजपाने जे वॉशिंग मशीन निर्माण केले आहे त्यास अण्णांचा आशीर्वाद आहे का?” असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.
हेही वाचा :“माझं सरकार पावसात वाहून गेलं नाही, खेकड्याने धरण….”, आला उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीचा टिझर
“…तसे आपल्या अण्णांचे झाले आहे काय?”
“महाराष्ट्रात ‘युती’चे सरकार असताना मंत्र्यांच्या विरोधात उपोषण करणारे हेच अण्णा आज दादा भुसे, अब्दुल सत्तार, मुश्रीफ, प्रफुल पटेल, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल अशांच्या घोटाळ्यांची दखल घेत नाहीत व एकदम मणिपुरातील हिंसाचारावर बोलू लागतात. पंतप्रधान मोदी हे ज्याप्रमाणे राष्ट्रीय समस्यांचा त्याग करून विश्वगुरू झाले तसे आपल्या अण्णांचे झाले आहे काय?” असा टोमणाही ठाकरे गटाने मारला आहे.