Uddhav Thackeray On Municipal Elections : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त आज मुंबईत शिवसेना (ठाकरे) पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगमी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. याबरोबरच ठाकरेंनी भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इशारा देखील दिला आहे.

आगमी महापालिका निवडणुकां स्वबळावर लढवण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “येत्या काही काळात महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. मुंबई, संभाजीनगर नाशिक सगळ्यांशी बोलून झालं. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा”.

कर्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार…

पुढे बोलताना ठाकरे समोर उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की,”ताकद आहे? अमित शहांना जागा दाखवणार आहात? ठीक आहे… अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द, तयारी बघू द्या… ज्या भ्रमात आपण राहिलो, त्या भ्रमातून पहिलं बाहेर या….ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही”.

“पण यावेळी मला सूड उगवून पाहिजे.. सूड, सूड आणि सूड होय सूड… जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो. जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहाणार नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना सांगितले.

ठाकरेंचा अमित शाहांना इशारा

“अमित शाहांना सांगतो की जास्त आमच्या नादी लागू नका. आज थोडासा ट्रेलर दाखवला आहे. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल”, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यावेळी बोलताना दिला.

अमित शाह, मराठी माणसाच्या नादी लागू नका-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला या महाराष्ट्राने झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती? मी मुद्दाम जाहीर सभा घेतली. कारण म्हटलं कळू तरी द्या की माझ्याबरोबर किती लोक राहिले आहेत? अमित शाह तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. कारण माझी जागा ठरवणारी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ही माझी शिवसैनिकांची संपत्ती आहे. जे शिवसेनाप्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक तोपर्यंत शिवसेनाप्रमुख आहे, तेच मी सांगतो आहे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर हा उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.

Story img Loader