राज्यात भाजपाबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही. मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते. त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता.”
हेही वाचा : “अजित पवार आमचे नेते”, या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा खूप वाईट वाटते. तुमच्यापैकी कोणाला आजही पक्ष सोडून जावेसे वाटत असेल तर खुशाल जा,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.
“ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे पक्षासाठी रक्त सांडले, त्यांना नाराज करायचे नाही म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : शरद पवारांना अजित पवार गटावर कारवाई करायची नाही? ‘त्या’ विधानाचा नेमका अर्थ काय? उज्ज्वल निकम म्हणतात..
“मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांना धूळ चारण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे,” अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिल्या.