Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. त्या अश्रूंचं मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याती जनतेला केलं आहे. इतकंच नाही तर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
“शरद पवारांची तशी ओळखच…”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाण्याचं कारण
मुंबईचा घात करण्याची योजना दिसतीये का? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “जसा रावणाचा जीव…”
पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “का नाही होणार? अन्यथा माझ्या लढाईला काय अर्थ आहे. शिवेसनाप्रमुखांना दिलेलं वचन अद्याप कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे, पक्षप्रमुख आहे. मी मुख्यमंत्री होईन असं म्हटलं नव्हतं. पण आता वचन पूर्ण झालं म्हणून मी काय दुकान बंद करुन बसणार नाही. मला शिवसेना वाढवायची आहे आणि तो प्रयत्न जर मी सोडणार असेन तर मग पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही”.
“मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती”
मुख्यमंत्रीपद सोडण्यास तुम्ही तयार होता का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले “मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती. पण त्या काळात जिद्दीने मी केलं. मी इच्छेने नाही तर जिद्दीने मुख्यमंत्री झालो. माझ्या परीने मी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला”.
“मी ऑगस्टमध्ये दौरा करणार”
“राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत आहे. यांना धडा शिकवायचा हीच चर्चा आहे. मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. गेल्या आठवड्यात मी जिल्हाप्रमुखांना काही सूचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रीय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जेव्हा मी राज्यात फिरु लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून थांबलो आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
“शिवसेनेचं तुफान निर्माण करावंच लागेल”
“महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचं तुफान निर्माण करावंच लागेल आणि ते आहेच. लोकांच्या मनात, ह्रदयात तुफान आहे,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. “मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी आहे. मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. त्या अश्रूंचं मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही हीच जनतेला विनंती आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.
फुटीरांनी तुमच्याकडे गद्दार म्हणू नका अशी विनंती केली आहे असं सांगण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी “म्हणून तर गद्दार नाही विश्वासघातकी म्हणत आहे. त्यांचाही मी मान ठेवला,” असा टोला लगावला.