शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही बंडखोर गटाने दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे त्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपालाही ठाकरे गटाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ‘मातोश्री’वर बोलताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी निवडणुकीवरून भाजपावर टीकास्र सोडलं आहे. तसेच, पक्षनाव आणि चिन्ह परत मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आयोगाचा निर्णय तात्पुरता”

“धनुष्यबाण गोठवलं तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारलं होतं. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगानं काही काळापुरता हा आदेश दिला आहे.नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी विनंती का करू?”

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि इतरांना विनंती करावी, असं मत व्यक्त केलं जात होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. त्याबद्दलही काही जणांना वाटतं की मी विनंती केली नाही. पण मी का विनंती करू?” असा सवाल त्यांनी केला.

“शिवसेना संपवण्यासाठीच हे सगळं केलं गेलं”

“माझ्या पक्षाचं नाव गोठवलंत, माझं चिन्ह गोठवलंत. एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात. मग एवढं सगळं कशाला केलं? फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.

राजन साळवींनाही प्रलोभनं

दरम्यान, राजन साळवींनाही शिवसेना सोडण्यासंदर्भात प्रलोभनं दाखवली गेली, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “इथे राजन साळवी उभे आहेत. त्यांच्यावरही दडपण आणलं गेलं. प्रलोभनं दाखवली गेली. पण हा माणूस हलला नाही. ते आज इथे आले. रत्नागिरी, कोकण परिसरात गद्दारांना गाडून त्यांच्या छाताडावर उभं राहण्यासाठी ते इथे आले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray slams bjp cm eknath shinde group andheri election pmw