शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच, शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. आज, ( ११ नोव्हेंबर ) उद्धव ठाकरे जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात बॅनर लावले होते. त्यातील ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी याचा एक व्हिडीओ ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर केला आहे.
जितेंद्र म्हणाले, “मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील, अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी, ‘असे काहीही होणार नाही. आपण निश्चिंत रहा. आमची सर्वत्र नजर आहे’ असं मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं होते.”
“आज उद्धव ठाकरेंचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने बॅनर शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के बॅनर आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक बॅनर फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात आणि ‘सर्वत्र नजर असणाऱ्या’ पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, ‘उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!,'” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
“असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशन आणि ठाणे पोलिसांचे आभार मानतो. ते ‘त्यांची ड्युटी’ मोठ्या निष्ठेने करत आहेत. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो मंजुरे खुदा होता हैं..!,'” अशी शायरी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.