शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्याच्या राजकारणात चालू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. दसरा मेळावा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी किंवा खरी शिवसेना कुणाची? यावरून निर्माण झालेल्या वादात हा कलगीतुरा चांगलाच रंगल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, नारायण राणेंच्या बंडखोरीवेळची एक आठवणही राऊतांनी सांगितली आहे.
“रामदास कदमांना गांभीर्यानं घेत नाही”
गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत यांनी कदम यांच्या टीकेला गांभीर्याने घेत नसल्याचं म्हटलं आहे. “रामदास कदमांनी सध्या जे बरळण्याचं काम सुरू केलं आहे, ते आम्ही फारसं गांभीर्यानं घेत नाही”, असं राऊत म्हणाले.
“गद्दारीची कीड त्यांनीच रुजवली”
शिवसेनेत गद्दारीची कीड सर्वप्रथम रामदास कदम यांनीच रुजवली, असं राऊत यावेळी म्हणाले. “नारायण राणे जात असतानाही त्यांच्यासोबत चार दिवस त्यांच्या बंगल्यावर रामदास कदम मुक्कामाला होते. तेव्हा शिवसैनिकांना फुटून नारायण राणेंसोबत येण्यासाठी वारंवार सांगण्यात रामदास कदम आघाडीवर होते.त्यात मी पुरावा द्यायची गरज नाही”, असं राऊत म्हणाले.
“त्यांची क्लिपच आम्ही जाहीर केली तर..”, अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर आशिष शेलारांचा इशारा!
‘त्या’ कार्यक्रमाची आठवण!
“काही दिवसांपूर्वीच राणेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात रामदास कदमांना फोन लावला आणि त्यांचं निष्ठेच्या बाबतीतलं वस्त्रहरण केलं, ते सगळ्या जनतेनं ऐकलं आहे. त्यामुळे आत्ता रामदास कदम यांना अक्कलदाढ सुचली असेल आणि ते शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी तो करू नये. तुमची जागा आणि तुमची निष्ठा काय आहे हे लोकांनी यापूर्वीच ओळखलेलं आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंबाबतच्या ‘त्या’ दाव्याला दुजोरा!
दरम्यान, यावेळी बोलताना विनायक राऊतांनी अशोक चव्हाणांच्या विधानाला दुजोरा दिला. मागील फडणवीस सरकारच्या काळातच एकनाथ शिंदे शिवसेनेचं एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला आहे. त्यावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपाच्या त्रासाला कंटाळून आवाज उठवणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे कल्याण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी जाहीर सभेत भाजपाच्या जाचाला कंटाळून मी मंत्रीपदाचा राजीनामा देतोय हे त्यांनी विधान केलं होतं. तेव्हा त्यांनी तसा राजीनामा उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यामुळे अशोक चव्हाण जे बोलले, ते खरं आहे. आत्ता ते भाजपाच्या एवढे जवळ कसे गेले, हे फक्त ईडीचे संचालकच सांगू शकतील”, असं राऊत म्हणाले.