ShivSena vs NCP Amol Mitkari on Baramati Incident : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर ‘लाडकी बहीण योजने’चा व त्यांच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांचं त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच बारामतीला जाणं पूर्वीपेक्षा कमी झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीमधील मित्रपक्षांचे (महायुतीमधील) कार्यकर्ते अजित पवारांवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवानिमित्त शिवसेनेच्या शिंदे गटाने बारामती येथील शारदा प्रांगणात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अजित पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला न आल्याने शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी व जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या पोस्टर्सवरील अजित पवारांचे फोटो काळ्या कपड्याने झाकले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “प्रत्येक पक्षात असे हौशे, नवशे, गवसे असतात. त्यातला हा नवशा कार्यकर्ता आहे. त्याला प्रसिद्धीझोतात यायचं होतं म्हणून त्याने काहीतरी कारण काढून अजित पवारांनी आम्हाला वेळ दिला नाही असं म्हणत त्यांचं पोस्टर काळ्या कपड्याने झाकलं. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस बारामती दौऱ्यावर असतात. त्यात त्यांना कदाचित वेळ मिळाला नसेल म्हणून तो अजित पवारांचं पोस्टर झाकून ठेवत असेल तर त्याच्याबद्दल काय बोलणार. तो बारामतीचा विकास झाकून ठेवू शकत नाही. १९९० पासून २०१४ पर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघाचा जो विकास झाला आहे तो कोणीच नाकारू शकत नाही.
हे ही वाचा >> Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत
या घटनेमुळे शिवसेनेचा शिंदे गट बदनाम झाला : अमोल मिटकरी
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यांच्यामुळे भाजपा बदनाम झाली. आता शिंदे गटाच्या बारामती जिल्हाध्यक्षाने अजित पवारांचं पोस्टर काळा कपडा टाकून झाकलं आहे. आजच्या या घटनेने शिवसेनेचा शिंदे गट बदनाम झाला आहे.