काँग्रेस नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कैलासनगर प्रभाग पोटनिवडणुकीत माजी महापौर मंगला निमकर यांचा शिवसेनेच्या बंडू खेडकर यांनी दारुण पराभव केला. पालकमंत्री व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना या निकालाने चांगलाच धक्का दिला.
नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर करताना पांढरे यांनी सेनेत प्रवेश करण्यापूर्वीच आपला राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सादर केला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावताना माजी महापौर मंगला निमकर यांना िरगणात उतरवले, तर सेनेने यापूर्वी निवडणुकीत पराभूत झालेल्या खेडकर यांनाच संधी दिली. काँग्रेसतर्फे पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी नगरसेवक सुनील नेरलकर, विद्यमान नगरसेवक किशोर भवरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसचे दिग्गज लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून प्रभागात तळ ठोकून होते.
रविवारी या पोटनिवडणुकीत ३७.०१ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. पहिल्या तीन फेऱ्यांत काँग्रेसच्या निमकर आघाडीवर होत्या. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकत्रे आनंद साजरा करण्याच्या तयारी असतानाच चौथ्या फेरीत खेडकरांनी आघाडी घेतली. मतमोजणीच्या शेवटी खेडकर यांना २ हजार २९३, काँग्रेसच्या निमकर यांना १ हजार ८६६, तर राष्ट्रवादीचे शेख अफसर शेख बाबू यांना ११, अपक्ष उमेदवार शेख अस्लम यांना १०९ व इंडियन मुस्लिम लीगच्या वाजिद अन्वर यांना १३ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खेडकरांना ४२७ मतांनी विजयी घोषित केले.
खेडकर यांच्या विजयाने उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याने पालकमंत्री सावंत यांच्या समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे. पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक महेश कनकदंडे ज्या भागात राहतात, तेथून सेनेला मताधिक्य मिळाले.

Story img Loader