शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने रिक्त झालेल्या कर्णिक रोड प्रभागातून देवळेकर यांचे समर्थक शिवसेनेचे प्रभुनाथ भोईर यांनी २ हजार ५८० मतांनी विजय मिळवला. आगामी विधिमंडळ निवडणुकीचा विचार करता देवळेकर यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या विजयामुळे त्यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
कर्णिक रोड प्रभागात बाहेरचा उमेदवार असूनही देवळेकर यांनी सर्व ‘प्रतिष्ठा’ पणाला लावून भोईर यांना निवडून आणले. काँग्रेस उमेदवार चैत्राली बोराडे यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला. बोराडे यांना ९३२, मनसेच्या रेखा भोईर यांना ५२६ मते मिळाली. उच्च न्यायालयाने देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द केल्यापासून त्यांचे राजकीय भवितव्य काय असे प्रश्न निर्माण केले जात होते. शिवसेनेतील एक अभ्यासू, मुत्सद्दी, मितभाषी नगरसेवक म्हणून देवळेकर यांच्याकडे पाहिले जाते. पालिकेच्या सभागृहात परिपक्व असा नगरसेवक आता नसल्याने शिवसेनेची गोची झाली होती. मात्र, भोईर यांना निवडून आणून देवळेकर यांनी आपली ताकदही दाखवून दिली आहे.