मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे.
यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यांनी गुवाहाटी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे हे शुक्रवारी गुवाहाटीहून मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळण्यापूर्वीच आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिंदे यांना पत्र लिहून राज्य सोडण्याची विनंती केली होती. आसाममध्ये भयावह पूर आला असताना राज्य सरकार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पाहुणचारावर करण्यात व्यग्र आहे. ही बाब आसाम राज्याच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य आणि अस्वीकार्य असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
भूपेन कुमार यांनी संबंधित पत्र हॉटेल ब्लू रेडिसनवर ड्युटीवर असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे दिलं आहे. पण आता एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला आल्यानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.