शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मान्यवरांनी समाज माध्यमांवरुन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या शंभराव्या वर्षीही बाबासाहेब ज्या उत्साहाने आणि ऊर्जेने बोलायचे ते खरोखरच थक्क करणारं होतं. नुकतीच वयाची ९९ वर्षे पूर्ण करुन १०० व्या वर्षात पदार्पण करताना बाबासाहेबांनी “आणखीन दोन तीन वर्षे मिळाली तर…” असं म्हणत एक इच्छा व्यक्त केलेली.
आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी २९ जुलै रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, वाचन आणि लेखन करून स्वत: काही करी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. पण, शिवचरित्राविषयी अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, असं बाबासाहेब वयाच्या १०० व्या वर्षी पदार्पण करताना म्हणाले होते.
नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”
…पण प्रकृती साथ देत नाही
“हौस असलेला आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेला माणूस कधीही समाधानी नसतो. मी आनंदी असलो तरी समाधानी नाही. खूप काम करावे असे वाटते. पण, प्रकृती साथ देत नाही. सगळे लोक प्रेमाने भेटतात. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. सर्वाना घेऊन रायगडावर जायचे आहे,” असंही बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते.
“आणखी मला दोन-तीन वर्षे मिळाली तर…”
“शंभरावं वर्ष लागलं. त्यासाठी मी वेगळे काही केले नाही. मला कसलेही व्यसन नाही. मी शंभर वर्षे जगावे ही जणू विधात्याची इच्छा होती. आणखी मला दोन-तीन वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की आजारी पडू देऊ नको. इथं दुखतंय, तिथं दुखतंय असं काही नको. अगदी छान स्वत: हलतोय, स्वत: बोलतोय, स्वत: चालतोय असं स्वावलंबी जीवन मला लाभावं अशीच माझी इच्छा आहे,” असं यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं होतं.
“आपल्या हातून कोणाचाही अपमान आणि कोणाचेही नुकसान होता कामा नये”
“आयुष्यात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव कधी आणता आला नाही. खेळण्यात बालपण गेले. जे शिकवितात ते गुरू एवढेच मला ठाऊक होते. या गुरूंविषयी आपण आदर बाळगला पहिजे. आपल्यासाठी राबणाऱ्या आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करणे योग्य नाही. आई-वडिलांशी गोड बोला. ते ओंजळीने भरभरून देतील हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. आपल्या हातून कोणाचाही अपमान आणि कोणाचेही नुकसान होता कामा नये. कोणाचाही राग करू नका, अशी शिकवण मला वडिलांनी दिली,” असंही बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते.