‘वैयक्तिक मता’ची भाजपलाही लागण
शेजारच्या आंध्र प्रदेशात होत असलेल्या चेवेल्ला धरणावरून संतापलेल्या आमदार शोभा फडणवीस यांनी शिवसेनेसोबतच्या युतीचा फेरविचार करा, अशी भूमिका घेतली असली तरी भाजपच्या वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याला कुणीही महत्त्व द्यायला तयार नाही. सध्या सर्वच पक्षांना ‘व्यक्तिगत मता’च्या रोगाची लागण लागली आहे. आमचाही पक्ष त्याला अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ नेते देऊ लागले आहेत.
महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर असलेल्या प्राणहिता नदीवर होणारे हे धरण विदर्भावर अन्याय करणारे आहे. या प्रश्नावर भाजपने विधिमंडळात आवाज उठवला असला तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र चुप्पी साधली आहे. विदर्भाच्या सोबतही राहायचे नाही व वेगळेही होऊ द्यायचे नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे सेनेसोबतच्या युतीचा आता फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी खुद्द भाजपच्या गोटात मात्र फारशी खळखळ नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शोभाताईंनी मांडलेली भूमिका त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे वक्तव्य करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आज केला.
भाजप-सेनेची युती अभेद्य असून येत्या निवडणुकीतसुद्धा ही युती कायम राहील, असे ते म्हणाले. याव्यतिरिक्त या वादावर आणखी काही बोलायचे नाही, असे मुनगंटीवार यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या शोभा फडणवीस यांच्या या भूमिकेवर पक्षाच्या वर्तुळात मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देशात आणि राज्यात पक्ष सत्तेत नाही. अशा स्थितीत सत्तेत येण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्याऐवजी पक्षाच्या पातळीवर पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जाहीरपणे भूमिका घेण्याची सवय सध्या अनेक नेत्यांना लागली आहे. दिल्लीतही असे नेते आहेत. आता महाराष्ट्रातसुद्धा त्याला सुरुवात झाली आहे. धोरणाच्या विरुद्ध जाणारी भूमिका घेऊन नंतर त्याला व्यक्तिगत मताचा मुलामा देण्याचा हा प्रकार एक प्रकारे रोगच आहे. अनेक पक्षांत या रोगाची लागण झाली आहे. इतरांपेक्षा वेगळा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्येसुद्धा हा रोग वेगाने पसरू लागला आहे. शोभाताईंचे वक्तव्य हे त्याचेच निदर्शक आहे, अशा शब्दांत पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज मत व्यक्त केले.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजप व शिवसेनेमध्ये एकमत नसले तरी इतर सर्व मुद्दय़ांवर एकमत आहे. सेनेचा विदर्भ राज्याला विरोध असला तरी त्यांचे उमेदवार विदर्भातून निवडून येतात. त्यामुळे टीका करण्याआधी हे वास्तवसुद्धा लक्षात घेतले पाहिजे, असे हा नेता म्हणाला.
सेनेशी युती तोडून पक्षाला केवळ विदर्भापुरते मर्यादित करायचे आहे काय याचाही विचार अशी भूमिका घेण्याआधी प्रत्येकाने करायला पाहिजे, असा टोला या नेत्याने लगावला. राज्यात सत्ता मिळवायची असेल तर सध्याच्या युतीला महायुतीमध्ये परावर्तित करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून अशा भूमिका घेऊन भांडण उकरून काढण्याने पक्षाचा फायदा नाही तर हानीच होईल याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.
या सर्व घडामोडी बघता फडणवीस यांच्या वक्तव्याला पक्षात फार महत्त्व दिले जात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा