गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सहानुभूती, मोदी लाट, तसेच पंकजा मुंडे यांची रणनीती याचा परिपाक म्हणजे आष्टीतून विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांना लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेतही पराभवाला सामोरे जावे लागले. बीड मतदारसंघातही मागील वेळी ७६ हजार मतांचे अधिक्य घेऊन विजयी झालेल्या व पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ऐन वेळी भाजपची उमेदवारी करणाऱ्या विनायक मेटे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत दमछाक केली. परंतु अवघ्या साडेपाच हजार मतांच्या फरकाने क्षीरसगार यांनी निसटता विजय मिळवला. मात्र, यामुळेच राष्ट्रवादीविरुद्धचा रोषही स्पष्ट झाला.
धस यांच्या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांनी शेवटच्या दोन फेऱ्यांत आघाडी घेत धस यांना अस्मान दाखवले. पाच वर्षांपूर्वी भाजपची उमेदवारी न मिळाल्याने धोंडे व साहेबराव दरेकर हे दोन्ही माजी धस यांच्याबरोबर गेले होते. त्यामुळे धस यांचा विजय सोपा झाला होता. भाजपकडून दोन वेळा व राष्ट्रवादीकडून एकदा निवडून आलेल्या धस यांना या वेळी पराभूत करण्याची घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धस व मुंडे या गुरू-शिष्यात सरळ लढत झाली. लोकसभेत दीड लाख मतांनी पराभव झाल्यानंतर धस यांनी मतदारसंघात जोरदार बांधणी केली. मात्र, पंकजा मुंडे यांनी जातीय मतांचे समीकरण जुळवत धोंडे यांना ताकद दिली. ओबीसीविरुद्ध मराठा असे मतांचे धुव्रीकरण झाले. यात धस यांच्यावरील नाराजीमुळे मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या गावांतही धोंडेंना मते मिळाली व अखेरच्या दोन फेऱ्यांत काटय़ाची लढत देणाऱ्या धस यांना ६ हजारांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
बीड मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मागील वेळी ७६ हजारांच्या फरकाने विजय मिळवला. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे होता. सक्षम विरोधक नसल्यामुळे क्षीरसागर नििश्चत होते. युती तुटल्यानंतर तर आपला विजय पक्का, असा विश्वास त्यांना होता. मात्र, अवघ्या १४ दिवसांपूर्वी भाजपची उमेदवारी करीत मैदानात उतरलेल्या विनायक मेटे यांनी त्यांची पुरती दमछाक केली. शेवटच्या फेरीपर्यंत येथे निकराची लढत झाली. क्षीरसागरांच्या राजुरी गावात मिळालेल्या ५ हजार मतांची आघाडी व सेनेमुळे मतविभागणी याच्या जोरावर क्षीरसागरांनी शेवटच्या क्षणी साडेपाच हजाराच्या मतांनी निसटता विजय मिळवला.  

Story img Loader