महापौर तृप्ती माळवी यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत रंग बदलण्यास सुरुवात केली असून काल त्यांनी राजीनामा दिला नाही. सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर माळवी राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. राजीनामा देण्याची मानसिकता नाही, असे नमूद करून माळवी यांनी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांना चांगलाच झटका दिला.
सोळा हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अटक होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अखेर त्यांना लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर माळवी रुग्णालयात उपचार घेत होत्या. तेव्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन महापौर पदाचा राजीनामा मिळविला होता. पक्षनेते आमदार हसन मुश्रीफ यांनी माळवी या सोमवारी राजीनामा देतील असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेतील घडामोडींकडे सर्वाचे लक्ष वेधले होते.
सोमवारी सभेला सुरुवात झाली. तेव्हा सभागृहात आलेल्या माळवी यांचा चेहरा उतरला होता. लाच प्रकरणाचे सावट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सभा संपल्यानंतर माळवी या महापौर पदाचा राजीनामा आयुक्तांकडे देणार असे सांगण्यात आले होते. पण सभा संपल्यानंतर त्या राजीनामा न देताच आपल्या दालनात निघून गेल्या. दालनामध्ये नगरसेवकांशी दीर्घकाळ चर्चा झाली. नंतर पत्रकारांशी बोलताना माळवी यांनी, आज राजीनामा देण्याची मानसिकता नव्हती असे सांगितले. १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेमध्ये राजीनामा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र त्या शब्द पाळतात का, की आणखी नवा रंग दाखवतात याकडे आता नजरा लागल्या आहेत.
माळवींच्या राजीनामा नकारामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांना झटका
महापौर तृप्ती माळवी यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत रंग बदलण्यास सुरुवात केली असून काल त्यांनी राजीनामा दिला नाही. राजीनामा देण्याची मानसिकता नाही, असे नमूद करून माळवी यांनी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांना चांगलाच झटका दिला.
First published on: 11-02-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shock to ncp leaders due trupti malvi refused to resign