रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी सांगितले होते.
भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.
“आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले, परण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, ”असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात, विशेषत: कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगलीमध्ये कोविड -१९ रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा प्लसचे सात पैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. १० जून रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १३.७ टक्के होता. त्यावेळा राज्याचा दर हा ५.८ होता. रत्नागिरीमध्ये करोनाचे ६,५५३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये येतो.
हे ही वाचा >> Coronavirus: …तो पर्यंत मुंबई अनलॉक करणे धोक्याचं; टास्क फोर्सचा इशारा
दोघांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाही
पाच जणांमध्ये डेल्टा प्लस विषाणू आढळल्याने ही गावे बंद करण्यात आली आहेत आणि कंटेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्र गावडे यांनी सांगितले. ज्या गावात डेल्टा प्लस प्रकार सापडला आहे, तेथील लोक बहुधा परदेशी जात असतात. मात्र, संक्रमित व्यक्तींना कोणताही प्रवास केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सने वर्तवली होती. महाराष्ट्रात “डेल्टा प्लस” प्रकार करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतो अशी तज्ञांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.