राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याता आता करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही भर पडत आहे. काल रात्रीपासून औरंगाबाद शहरातील चार व सिल्लोड येथील एक अशा पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे अगोदरच रेड झोनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णांचा काल रात्री 9.30 वाजता, गारखेडा येथील पुरूष रुग्णाचा काल रात्री 9.35 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आज 25 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता रोहीदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा, कैलास नगर येथील 75 वर्षीय महिलेचा मध्यरात्री 3.15 वाजता व सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णांचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्णांमध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.  आतापर्यंत ‘घाटी’त उपचारादरम्यान 50 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या घाटीत 70 करोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

तर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) आज करोनामुक्त झालेल्या 11 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधीनगर, हिमायतनगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी करोनाचे 16 नवे रुग्ण वाढल्याने, जिल्ह्यात आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 301 वर पोहचली आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश कॉलनी (1), जवाहर नगर, गारखेडा परिसर (1), शाह बाजार (1), मयूर नगर, एन-6, सिडको (1), राम नगर, एन 2 (1), गजानन मंदिर परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

सामान्य नागरिकांबरोबर प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 51 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.