करोनाच्या गावकरांच्या भीतीने आई-वडिलांनी १६ वर्षीय मुलाचा मृतदेह चार दिवस घरातच ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या मुलाचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. जावली तालुक्यातील म्हाते खृर्द येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दहावीत शिकत असलेल्या  या सोळा वर्षीय मुलाचा घरातच मृत्यू झाला होता.  दुर्धर आजार जडल्याने सहा महिन्यांपासून तो घरीच  होता. करोना प्रादुर्भावाच्या काळात त्यालाही संक्रमण होईल या भीतीने नातेवाईकांनी त्याच्यावर उपचार केले नाहीत. आजारी असला तरी त्याच्यावर उपचार का केले नाहीत? घरी येणाऱ्या आशा स्वयंसेविकांना याची माहिती का दिली नाही? याबाबत प्रशासन माहिती घेत आहे.

अखेर  रविवारी या मुलाच्या घराच्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने, गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली. दुर्गंधी अधिकच पसरू लागल्याने अखेर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे.  संबंधित कुटुंब २६ मार्च रोजी मुंबईहून गावी आलेले आहे.  मुलाचा मृत्यू नेमका कशाने झाला आणि आई-वडिलांनी असे का केले? याचा तपास सुरू आहे. चार दिवस अगोदर मृत्यू होऊनही मृतदेह घरीच ठेवल्याने व घरातील नातेवाईक मृतदेहा सोबतच घरात रहात असल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.

जावली तालुक्यातील म्हाते खृर्द येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.या प्रकारामुळे या गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृतदेहाला दुर्गंधी बरोबरच किडेही लागले होते. या प्रकाराने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Story img Loader