शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलात नाश्ता करण्यासाठी बसलेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी आज भर दुपारी केलेल्या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे एटापल्ली परिसरात दहशत पसरली आहे.
एटापल्लीपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट्टा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव व काही जवान आज सकाळी ११ च्या सुमारास गावात असलेल्या कृष्णा डे या महिलेच्या हॉटेलात नाश्त्यासाठी गेले होते. जाधव यांच्या सोबत दोन पोलिस जवान होते. रस्त्यावर असलेल्या या हॉटेलात आणखी अनेक ग्राहक होते. नक्षलवाद्यांच्या शीघ्र कृती दलाचे तीन सदस्य अचानक या हॉटेलात शिरले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यात जाधव यांच्या मांडीला गोळी लागली. याशिवाय उमेश कोडापे या जवानाच्या हाताला गोळी चाटून गेली. या हॉटेलच्या मालकीण कृष्णा डे यांनासुध्दा गोळी लागली. सहा गोळय़ा झाडून नक्षलवादी पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस  घटनास्थळी आले. जखमी अवस्थेतील जाधव व महिलेला तातडीने हेलीकॅप्टरने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले. या हॉटेलमध्ये पोलीस रोज नाश्ता करण्यासाठी येतात ही बाब नक्षलवाद्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी आजचा सापळा रचला. या परिसरात मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा