लातूरकरांसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची लोहय़ात पहिलीच प्रचार सभा झाली. मात्र, सभेत शक्तिप्रदर्शन होईल, हा अंदाज फोल ठरला. सभास्थानी जेमतेम २ हजारांच्या आसपास लोक उपस्थित होते.
दरम्यान, लातूरकरांनी मागील ‘मानापमान’ नाटय़ गिळून चव्हाणांकडे मदतीचा ‘हात’ मागितला असल्यामुळे त्यांनीही हातचे न राखता तो पुढे केला. राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना नांदेड-लातूरकरांची एकजूट प्रत्यक्षात आल्यास काँग्रेससाठी तो शुभसंकेत ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे. लातूर-नांदेड एकजुटीतून मराठवाडय़ाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होण्यास लोहा, कंधारमधील जनतेने काँग्रेसच्या पाठीशी आपले सामथ्र्य द्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी या वेळी केले. बुधवारी सायंकाळी लोहा येथे आयोजित या सभेला आमदार दिलीपराव देशमुख, शंकरराव धोंडगे, ईश्वर भोसीकर आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत असून मराठवाडय़ातील आठही जागांची जबाबदारी आपणावर सोपविण्यात आली आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, की नांदेड, लातूरचे नाते अतूट आहे. बनसोडे गुरुजींना मीच जामीन आहे. माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना निवडून द्या. मोदींची फक्त हवा आहे. या हवेला भुलून नुकसान करून घेऊ नका. एकदा चूक केली की ती निस्तरणे अवघड जाईल हे लक्षात ठेवा, असे सांगण्यासही चव्हाण विसरले नाहीत. आमदार दिलीपराव देशमुख यांनी भाजप म्हणजे गारपीट व काँग्रेस म्हणजे मोसमी पाऊस असल्याचा पुनरुच्चार या सभेतही केला. विलासराव समर्थक माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मात्र या सभेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा लोहेकरांत होती.