सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यांमध्ये तब्बल ३०० ते ५०० ग्रॅमची तूट आढळून येत आहे. त्यामुळे हा फरक की धान्य घोटाळा? असा प्रश्न धान्य दुकानदारांकडून व्यक्त केला जात आहे. एका दुकानदाराकडून नाव न प्रसिद्ध करण्यासाठी याबाबतची माहिती देण्यात आली आहे तसेच या प्रकाराची वरिष्ठांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून धान्य दुकानातून ग्राहका पर्यंत रेशन पुरवठा करण्याची पद्धत आजपर्यंत चालू आहे. स्वस्त आणि चांगले गहू, तांदूळ ,डाळ, साखर असे काही रेशनिंग धान्य मधून जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा मानस शासनाचा आहे मात्र गेल्या काही महिन्या पूर्वी पासून सावंतवाडी तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशनिंग दुकानात येणाऱ्या धान्यात मोठी तूट येत आहे ,हि तूट ३०० ग्राम ते ५०० ग्रॅम पर्यंत पोत्यामागे येत आहे.हा फरक लक्षात घेतला असता जिल्ह्यात व तालुक्यात मोठा धान्य घोटाळा सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तालुक्यात सुमारे ६५ रेशन दुकाने आहेत तर ५५०० क्विंटल धान्य दरमहा तालुक्यात वितरित करण्यात येते बहुतांशी दुकाने हि ४०० रेशनकार्ड च्या वरची आहेत तालुक्याचा पुरवठा ठेकेदार आपल्या नियमाचे पालन न करता धान्यांचा पुरवठा करीत असल्याची तक्रार धान्य दुकानदार करीत असतात त्याच प्रमाणे तालुका पुरवठा विभागाच्या कर्मचारी अधिकारी वर्गाने झोपेचे सोंग घेतल्याची चर्चा आहे.
धान्यात येणारी तूट हि दर महिन्याला येत आहे.या दुकानदारांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. प्रत्येक पोत्यामागे येणारी तूट दुकानदार म्हणून आम्ही सहन का ? करायची असा सवाल करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी एका दुकानदाराकडून करण्यात आली आहे.