अलिबाग : कोकण रेल्वे फाटका वरील गेटमन चंद्रकांत कांबळे याच्या खुनाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. कांबळे याचा खून त्याचा सख्खा मेहुणा विजय शेट्टी यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फरार विजय शेट्टीचा रायगड पोलीस शोध घेत आहेत. चंद्रकांत कांबळे हा तिसे रेल्वे फाटक इथ २१ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना भरदिवसा त्याच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते.
अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली. अंगुली मुद्रा तज्ञ , फॉरेन्सिक तज्ञ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक यांनी घटना स्थळाचे निरीक्षण करून मागोवा घेत गुन्ह्याचे पुरावे, खाणाखुणा शोधण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत कांबळे याच्या खून्याचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी करीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील दबाव वाढला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा समांतर तपास सोपवण्यात आला.
हेही वाचा >>> सांगली : बनावट प्रमाणपत्राद्वारे पोस्टात नोकरी; गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी तसेच २२ कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करून विविध अंगाने या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. चंद्रकांत कांबळे याची बहीण विमल शेट्टी व तिचे पती विजय शेट्टी यांच्यात वाद होता. दोघांच्या संयुक्त नावावर असलेले रोहा तालुक्यातील खैरवाडी येथील घर विजय शेट्टी यांना विकायचे होते. त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. या घराची झाडाझडती आणि पंचनामा केल्यानंतर विजय शेट्टी यानेच चंद्रकांत कांबळे याचा खून केल्याची पुष्टी देणारे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
हेही वाचा >>> “मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी चुकीची”, ओबीसी महापंचायतीकडून महामोर्चाचा इशारा
विजय शेट्टी याच्यावर यापूर्वी पनवेल येथे गोळीबार करून दुहेरी खून तसेच पुण्यात मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून विजय शेट्टी यानेच चंद्रकांत कांबळे याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. रोह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असून त्यांची ४ पथके फरार आरोपी विजय शेट्टी याचा शोध घेत आहेत.आरोपीला लवकरच जेरबंद करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.