Devendra Fadnavis on Leader of Opposition Seat : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि पिंपरी चिंचवडचे आमदार आण्णा बनसोडे यांची एकमताने आज निवड करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची म्हणजेच विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर कोणावर बसवणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
पान टपरी चालवणारे उपाध्यक्ष बनले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आण्णा बनसोडे यांच्या निवडीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करत होते. “महाराष्ट्र विधानमंडळाला फार मोठी परंपरा आहे. या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. देशात सर्वाधिक काळ चालणारं सभागृह आपलं आहे. आपली परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर आहे. आज संविधानावर चर्चा करत आहोत. भारताचं संविधान किती मोठं आहे, त्यामुळे कशाप्रकारे सामान्यातील सामान्य माणसाला मोठ्या पदावर जाण्याची संधी दिली आहे हे आज आपण पाहू शकतो. चहा टपरी चालवणारे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री बनले आणि ज्यांनी पान टपरी चालवली ते आज राज्याचे उपाध्यक्ष झाले. भारतीय संविधानाने अशाप्रकारे संधीची समानता दिली. यापेक्षा मोठं उदाहारण असू शकत नाही.”
डाव्या बाजूसह उजव्या बाजूचंही ऐका
या सभागृहातील विरोधी पक्षाचं अभिनंदन करतो. विरोधी पक्षाने मोठं मन दाखवत उपाध्यक्षांची एकमताने निवड होण्याकरता दुसरा अर्ज केला नाही. या ठिकाणी पहिलं, आण्णांना विनंती करतो की आपण त्या खुर्चीवर बसल्यानंतर दोन्ही कान शाबूत ठेवावेत. डावीकडे बसलात म्हणून फक्त डावीकडचं ऐकून घेऊ नका. ती बाजू ऐकाच, पण ती उजवी बाजूही ऐका. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा नरहरी झिरवाळ पिठासीन असायचे. तेव्हा ते गंमतीने म्हणायचे की मला जरा डाव्या कानाने कमी ऐकू येतं. तसं मला वाटतं की आपण निश्चितपणे म्हणणार नाहीत, त्यामुळे दोन्ही कानांनी नीट ऐकू येणारे अशाप्रकारचे आमचे उपाध्यक्ष निवडले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाला तक्रार करायला जागा राहणार नाही, हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षाचं समाधान कधीच होत नसतं. जो विरोधी पक्ष समाधानी झाला, तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमाधानीच राहाल”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
घाईत घेऊ का निर्णय?
दरम्यान, बाजूच्या खुर्चीचा निर्णय केव्हा घेणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की ते मला विचारा. राहुल नार्वेकरांनंतर लागलीच देवेंद्र फडणवीस मिश्किलीत म्हणाले की, “उपाध्यक्षांना काही काळ मोकळं बसू देऊयात. ” तसंच पुढे फडणवीस म्हणाले की, “बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील त्यावेळी आम्हाला मान्य असेल.” देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले, “घाईत निर्णय घेऊ का?” त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. म्हणजेच, अद्यापही राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याबाबत कोणतीही खात्री मिळू शकलेली नाही.