धाराशिव : वरिष्ठांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेले डिजिटल फलक ही गंभीर बाब आहे. ४८ तासाच्या आत याप्रकरणी आपला खुलासा सादर करावा. मुदतीत तो प्राप्त न झाल्यास आणि खुलासा असमाधानकारक असल्यास आपल्याविरोधात प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा तुळजाभवानी मंदिर समितीचे धार्मिक सहव्यवस्थापक तथा सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न! ‘ते’ निर्बंध मागे
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक देवीदर्शनासाठी येतात. गुरूवारी मंदिर परिसरात अचानक डिजिटल फलक झळकल्याचे दिसून आले. मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी असभ्य आणि अशोभणीय कपडे घालण्यास बंदी असल्याचे त्यावर ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. फलकावर तुळजाभवानी मंदिर संस्थान असा उल्लेखही करण्यात आला होता. प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान या सगळ्या बाबी आढळून आल्या आहेत, असे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून वरिष्ठांना डावलून केलेल्या या कृत्याचा तत्काळ लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश या नोटीशीद्वारे देण्यात आले आहेत. तसेच त्याची प्रत मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि मंदिर समितीचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.