हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असताना त्यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत. आम्ही आमचं सरकार आल्यानंतर दहीहंडी जोरात साजरी केली, गणेश उत्सव जोशात साजरा केला. दिवाळीही जल्लोषात साजरी केली. लोकं बाहेर पडले घराच्या त्याचा लोकांना आनंद झाला. चीन, जपानमध्ये करोना आला आहे सरकार बदललं नसतं तर इथे अधिवेशन झालं नसतं. असंही एकनाथ शिंदे म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना त्यांनी ही टोलेबाजी केली.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना काय टोले लगावले आहेत?
आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्याचं कौतुक विरोधकांनी करायला हवं होतं. पण तसं झालं नाही. आज करोना जपान आणि चीनमध्ये आहे. मी खरंच सांगतो सरकार बदललं नसतं तर इथे अधिवेशन झालंच नसतं. अजित पवारही या गोष्टीला नकार देणार नाहीत. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळलं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. कधीही त्याला काही मागायची गरज लागली नाही.

..म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला

हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं.

अजितदादा तुम्ही काल म्हणालात की मी चुकलो. त्यानंतर तुम्ही आत्मक्लेश केला. जो माणूस चूक सुधारतो तो आत्मक्लेश करतो. मात्र काही लोक चुकले तरी आम्हीच बरोबर म्हणतो. एक माणूस चुकतो, दोन चुकतात, पाच चुकतात, दहा चुकू शकतात.. पण ५० जण? तरीही एक माणूस म्हणतो ते पन्नास लोक चुकीचे आणि मीच बरोबर असं कसं होऊ शकतं? अजितदादा हे मी तुम्हाला बोलत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबूटिंबूची भाषा करत आहेत

ज्या प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांना कायम विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबांची भाषा करायला लागले? मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो आधी काय काय आहे ते बघा म्हटलं. आम्हाला पाटीभर लिंबं सापडली तिकडे. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली.

आम्ही रेशीमबागेत गेलो गोविंदबागेत नाही
आम्ही रेशीमबागेत गेलो त्यावरही टीका झाली. आम्हाला रेशमाचा किडा वगैरे संबोधलं गेलं. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो आहोत. आम्हाला बोलणाऱ्यांनी एवढं लक्षात ठेवावं आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. आम्हाला आव्हान देण्यात आलं की हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा. जे काहीही न करता घरात बसून राहतात ते आम्हला शिकवत आहेत ही बाब आश्चर्याचीच आहे.

जयंत पाटील सभागृहात नाहीत. पण ते बरोबर बोलत होते. राष्ट्रवादीची शिवसेना.. ते योग्यच बोलले. आम्ही पण तेच सांगत होतो त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. बाप चोरला वगैरे म्हणत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पितृतुल्यच आहेत. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच विचार चोरले म्हणता? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकले ते आमच्याविरोधात कसं बोलतात? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रोज एवढी जळजळ, मळमळ होणं बरोबर नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader