Shraddha Walkar Murder Case: वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं फार कठीण होतं असं म्हटलं आहे.
मृत तरुणी वसईची असून तिचं नाव श्रद्धा वालकर असं आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. तसंच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे.
वसईतील तरुणीची दिल्लीत हत्या; सहा महिन्यांनंतर गुन्हा उघडकीस, प्रियकराने मृतदेहाचे तुकडे करून फेकले
चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचं ठरवलं. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं आहे.
आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.
हे निर्घृण कृत्य करणं आपल्यासाठी फार सोपं नव्हतं अशी कबुली आफताबने दिली आहे. मृतदेहाचे तुकडे करण्याआधी आपण दारु पित होतो, तसंच दुर्गंध येऊ नये यासाठी तोंडावर मास्क किंवा कपडा बांधत होतो असं त्याने सांगितलं आहे. आपण हे नेमकं काय करुन बसलो आहेत आणि कशात अडकलो आहोत हा विचार करुन आपण सारखं रडत होतो असंही त्याने सांगितलं. पण अटक होण्याच्या भीतीपोटी त्याने न थांबण्याचं ठरवलं होतं.
Shraddha murder case :’हा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण?’ राम कदम यांनी व्यक्त केली शंका
मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.
पोलीस आफताबपर्यंत कसे पोहोचले?
श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसंच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचं आढळलं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या आहेत.