गेल्या महिन्याभरापासून देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून त्यात आता नवी मुंबई पोलिसांचंही नाव घेतलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२०मध्ये श्रद्धानं पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये आफताब पूनावाला तिची हत्या करू शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर तिने ही तक्रार मागेही घेतल्याचं पत्र व्हायरल झालं. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत असताना त्याअनुषंगाने सत्ताधारी भाजपानं यावरून थेट उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या कालच्या पत्रकार परिषदेमधला एक व्हिडीओ भाजपानं ट्वीट केला असून त्यावरून टीकास्र सोडलं आहे.
“उत्तर देऊ नका, सोडून द्या?”
भाजपानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. उद्धव ठाकरेंना श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि त्याअनुषंगाने पोलिसांच्या कृतीविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरासंदर्भातला हा व्हिडीओ आहे. यावरून भाजपानं उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, तुमच्या लेखी दुसऱ्यांच्या मुलींची काय किंमत आहे? पत्रकारांनी श्रद्धा वालकरबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ‘उत्तर देऊ नका, सोडून द्या?’ याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज म्हणायचा?” असा सवाल भाजपानं उद्धव ठाकरेंना केला आहे.
काय आहे त्या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये पत्रकार परिषदेत श्रद्धा वालकर प्रकरणाविषयी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नेमकं काय घडलं, ते दिसत आहे. एका हिंदी पत्रकाराने विचारणा केली की, “श्रद्धानं महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात पोलिसांकडे तक्रार केली होती, तेव्हा त्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे”. हा प्रश्न विचारला जात असताना बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात ‘सोडून द्या’ असं म्हटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यानंतर उद्धव ठाकरेंनी या प्रश्नावर सध्या उत्तर न देता नंतर सविस्तर बोलू, असं सांगितलं. “ठीक आहे. हा विषय मोठा आहे, गंभीर आहे. या विषयावर स्वतंत्रपणे बोलू”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
नेमका आरोप काय?
श्रद्धानं २०२०मध्येच आफताब तिची हत्या करू शकतो, तो सातत्याने मारहाण करतो असा तक्रारअर्ज नवी मुंबईतील तुळींज पोलीस स्थानका दिला होता. मात्र, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली नसल्याचा दावा आता करण्यात येत आहे. पोलिसांनी श्रद्धाच्या अर्जावर तातडीने कार्यवाही केली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. शिवाय, आता या प्रकरणी पोलिसांचीही चौकशी केली जाणार असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.