‘‘वारकरी चळवळीत मुळात नसलेल्या अन्यायकारक गोष्टी त्यात घुसडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. काठी, घोंगडे आणि दहीभाताचा काला ही ओळख असलेल्या विठोबाला रेशिमवस्त्र वाहावे हे कुणी सांगितले? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विठ्ठलाची विशेष पूजा बांधण्याचा अधिकार मिळण्याचा संबंध काय? या शासकीय पूजा बंद व्हायला हव्यात. या संप्रदायात आता राजकारण घुसले असून त्यात स्वत:च्या ‘लॉबी’ तयार करण्याचेही प्रयत्नही सुरू झाले आहेत,’’ असे मत श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात ‘वारकरी चळवळ आणि सामाजिक वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि अभय टिळक यांनीही आपली मते मांडली.
पाटणकर म्हणाले, ‘‘वाळवंटी जमून वर्ण, अभिमान आणि जात विसरून ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची मांडणी जेव्हा संत करतात, तेव्हा त्यात केवळ लोकशाहीचीच नव्हे तर जातीअंताची आणि लिंग व धर्मभेदाच्या विरोधाचीही स्पष्ट दिशा दिसते. ही सगळी शांततेच्या मार्गाने आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात वादविवाद करून लढण्याची परंपरा आहे. ही देवता कष्टकरी आणि सर्वसामान्यांमधून निर्माण झाली आणि त्यांनीच ती पुढे नेली. तरीही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना विठ्ठलाच्या देवळात प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींना बेमुदत उपोषण करावे लागलेच. वारकरी संप्रदायात हे कधी आले? पुजारी ही देखील नंतर घुसडली गेलेली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विठ्ठलाची विशेष पूजा बांधण्याचा अधिकार मिळण्याचा संबंध काय? या सरकारी पूजा बंद व्हायला हव्यात. या संप्रदायात आता राजकारण घुसले असून त्यात स्वत:च्या ‘लॉबी’ तयार करण्याचेही प्रयत्नही सुरू झाले आहेत. पण जे वारकरी बाजारूपणासाठी या चळवळीत आले नाहीत ते या प्रयत्नांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत.’’
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात संत निर्माण व्हायची प्रक्रिया ज्ञानेश्वर-नामदेवांपासून निळोबांपर्यंत चालली. तिथून पुढच्या कुणालाही परंपरेने संत म्हणून स्वीकारले नाही. वारकरी संप्रदायाला संतांचा विचार जितका पेलवला तितका त्यांनी तो घेतला. पण त्यांना तो संपूर्णपणे पेलला असे म्हणायचे धाडस मी करणार नाही. वारकरी हे कुठले परग्रहावरचे नसून ते इथल्याच समाजवास्तवाचा भाग आहेत. त्यामुळे हे वास्तव ओलांडून किती पुढे जायचे याच्या त्यांनाही काही मर्यादा होत्याच. ज्या वेळी संतविचारांची अंमलबजावणी वारकरी संप्रदायाकडून नीट होत नाही हे राज्यातील जाणकार आणि नव्याने इंग्रजी विद्या शिकलेल्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी संप्रदाय बाजूला ठेवत तो विचार आत्मसात केला. मर्यादा संतांच्या विचारांची नव्हे तर ती सांप्रदायिकांची होती. कारण ती माणसे आहेत.’’
वारकरी चळवळ हा जातीअंताचा लढा नव्हता, तर तो जातीजातींमधील विद्वेश कमी करण्याचा लढा होता, असे सांगून अभय टिळक म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा वारसा प्रगल्भ असला तरी त्याचा अंगीकार करण्याची आपली इच्छा आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात आपल्या कोणालाही संतांच्या विचारांचा अंगीकार करावासा वाटत नाही. दांभिकता सोडली तरच संत चळवळीचा आजच्या सामाजिक वास्तवाशी काय संबंध आहे ते समजेल.
महाराष्ट्रात संत निर्माण व्हायची प्रक्रिया ज्ञानेश्वर-नामदेवांपासून निळोबांपर्यंत चालली. तिथून पुढच्या कुणालाही परंपरेने संत म्हणून स्वीकारले नाही. वारकरी संप्रदायाला संतांचा विचार जितका पेलवला तितका त्यांनी तो घेतला. पण त्यांना तो संपूर्णपणे पेलला असे म्हणायचे धाडस मी करणार नाही. वारकरी हे कुठले परग्रहावरचे नसून ते इथल्याच समाजवास्तवाचा भाग आहेत.
– डॉ. सदानंद मोरे