एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता
सोलापूर : ज्वारी, बाजरी, मका आदी भरड धान्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्याची घोषणा आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली होती, मात्र नव्या शासकीय परिपत्रकानुसार हा प्रकल्प बारामतीला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विरोधात भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी या वर्षांला ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती. सोलापूर जिल्हा हा ज्वारी, बाजरी, मका अशा भरड धान्ये पिकवण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे हा प्रकल्प येथे उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. पंरतु गेल्या आठ महिन्यांत हे केंद्र सोलापुरात सुरू करण्याबद्दल काहीही हालचाल झाली नाही. शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) संचालकांच्या सुधारित प्रस्तावानुसार बारामती येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्यास मान्यता दिल्याचे २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहे.
हेही वाचा >>> कराडमधील तो भीषण स्फोट हा बॉम्बचा नसल्याचा निष्कर्ष ; फॉरेन्सिक लॅबचा नकारात्मक अहवाल
सोलापूरला जाहीर करण्यात आलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र कायम आहे. केवळ यातील शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प बारामतीमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य अशी प्रशिक्षण संस्था नसल्याचा अहवाल हैदराबादच्या राष्ट्रीय तृणधान्य संशोधन केंद्राने (आयआयएमआर) राज्य शासनाला सादर केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
– कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा नसल्याचा अहवाल भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेने दिल्यामुळे फक्त प्रशिक्षण केंद्र बारामतीसाठी मंजूर झाले आहे. मात्र सोलापुरातही असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेखाली सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, सोलापूर
सोलापूरसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ अचानक बारामतीला देण्याबाबत शासनाने काढलेले परिपत्रक संभ्रम निर्माण करणारे आहे. सोलापुरात हे केंद्र सुरू न केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन.
– सुभाष देशमुख, भाजप ,आमदार
केंद्राचा उपयोग.. या केंद्राद्वारे श्री अन्नाच्या उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास, प्रचार आणि प्रसिद्धीचा कार्यक्रम आखला जाणार आहे. तसेच तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हैदराबादच्या राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्थेमार्फत (आयआयएमआर) सामंजस्य करार केले जाणार आहेत.