अलिबाग: मंदीरात जमा होणाऱ्या निर्माल्याचे व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान ट्रस्टने निर्माल्यापासून अगरबत्ती उत्पादनाला सुरवात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या उपक्रमाची दखल घेऊन श्रीववर्धन येथील सोमजाई देवस्थान आणि दिवेआगर येथील सुवर्ण गणेश देवस्थाननेही असाच प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मंदीरातील निर्माल्याचे व्यवस्थापन करणे सुलभ होणार आहे. तर निर्माल्यातून निर्माण होणारा सुगंध घरोघरी दरवळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीवर्धन मधील हरीहरेश्वर देवस्थान हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दक्षिण काशी म्हणून या देवस्थानची ओळख आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनाला येत असातत. ज्यांना काशीविश्वेश्वराला जाता येत नाही असे भाविक हरिहरेश्वराचे दर्शन घेतात. त्यामुळे बाराही महिने इथे भाविकांची गर्दी असते. या शिवाय विवीध प्रकारचे धार्मिक विधी या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होत असते. या निर्माल्याचे व्यवस्थापन करणे ही देवस्थानसाठी मोठी समस्या बनली होती.

गेली अनेक वर्ष भाविकांकडून आलेले निर्माल्य नंतर समुद्रकीनाऱ्यावर टाकले जात होते. पण नंतर निर्माल्याचे प्रमाण वाढत गेल्याने, समुद्र किनाऱ्यावर अस्वच्छता पसरण्यास सुरूवात झाली. त्यामुळे निर्माल्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची गरज भासू लागली. निर्माल्याचे विघटन योग्य प्रकारे कसे करावे हा प्रश्न व्यवस्थापनासमोर होता. अखेर निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. देवस्थानचे सचिव सिध्देश पोवार यांनी पुण्यातील अगरबत्ती व्यवसायिक श्रीराम कुंटे यांची मदत घेऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. मंदीरात दररोज जमा होणाऱे हार, फुले बेलपत्र एकत्र करून त्यापासून अगरबत्ती निर्मितीला सुरूवात केली. निर्माल्यापासून तयार झालेली अगरबत्ती देवस्थानात विक्रीसाठी ठेवली. त्यामुळे या उपक्रमातून देवस्थानला उत्पन्नही मिळणार आहे. निर्माल्यातून तयार झालेल्या अगरबत्तीचा सुगंध भाविकांच्या घरोघरी दरवळणार आहे.

या उपक्रमाची दखल घेऊन आला श्रीवर्धन येथील सोमजाई माता देवस्थान ट्रस्ट आणि दिवेआगर येथील सुवर्णगणेश मंदीर देवस्थानने असाच उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे. लवकरच दोन्ही देवस्थानांकडून निर्माल्यापासून अगरबत्ती उत्पादन सूरू केले जाणार आहे.

विक्रीला उत्तम प्रतिसाद

निर्माल्यापासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्त्या मंदीरात विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. ज्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दररोज ५० ते ६० बॉक्सची विक्री होत असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे देवस्थानच्या उत्पन्न देखील वाढले आहे.

सध्या मंदीरात संकलित होणारे ७०० किलो निर्माल्य अगरबत्ती बनविण्यासाठी पुण्यात पाठविले जाते. यातून तयार झालेल्या अगरबत्ती विक्रीसाठी हरिहरेश्वर येथे आणल्या जात आहेत. नंतर मात्र महिला बचत गटांशी करार करून या अगरबत्ती हरिहरेश्वर येथेच बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यामुळे स्थानिक महिलांना यातून रोजगार मिळू शकेल. – सिध्देश पोवार, सचिव हरिहरेश्वर देवस्थान

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shree harihareshwar temple trust in shrivardhan raigad has started agarbatti production from nirmalya dvr