सोलापूर : देशभर नावारूपास आलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने आपल्या सेवाकार्याचा विस्तार करीत सुमारे ६५ कोटी रूपये खर्च करून पाच मजली देखणे महाप्रसादगृह उभारण्याचा संकल्प सोडला आहे. संपूर्णतः वातानुकूलित असलेल्या या महाप्रसादगृहात एकाचवेळी अडीच हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. तर पाच हजार  भाविकांसाठी आधुनिक सुविधांसह प्रतीक्षालय उभारले जाणार आहे.

अक्कलकोट नगरीच्या सौंदर्यात भर टाकणा-या या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन येत्या २१ जुलै रोजी, गुरूपौर्णिमेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलन भरकटले : नरेंद्र पाटील

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना १९८८ साली गुरूपौर्णिमेच्या दिवशी जन्मेंजयराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. दररोज हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यासह पाच हजार भाविकांसाठी यात्री निवास आदी सुविधा कार्यरत आहेत. वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने भाविकांकडून मिळणा-या देणग्यांच्या बळावर उत्तरोत्तर सेवा विस्तार केला आहे. अन्नछत्र मंडळाच्या परिसरात शिवस्मारक, उद्यान, वाटिका कार्यरत आहेत. दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या पर्वावर धार्मिक व सांस्कृतिक संकीर्तन महोत्सवासह वर्षभर विविध उपक्रम  राबविले जातात. केवळ भाविकांपुरतेच नव्हे तर राज्यात व देशात ज्या ज्यावेळी भूकंप, वादळ, महापूर यासारखी नैसर्गिक संकटे कोसळली, त्यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मदतीचा हातभार लावला आहे. अक्कलकोट परिसरातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना दररोज दोनशे जेवणाचे डबे सन्मानाने पोच केले जातात. नवोदित पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी दररोज खुराकही दिला जातो. संस्थेने गोव्यातही पाच एकर जमीन खरेदी करून तेथेही सेवाकार्य हाती घेतले आहे.

हेही वाचा >>> आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब

अक्कलकोटमध्ये भाविकांचा ओघ वाढू लागल्यामुळे काळाची गरज ओळखून संस्थेने एक लाख १९ हजार ३९८ चौरस फूट आकाराचे भव्य पाच मजली महाप्रसादगृहाची उभारणी हाती घेतली आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी  प्रक्रिया पूर्ण केल्याचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले. या नियोजित वातानुकूलित महाप्रसादगृहाच्या वास्तुमध्ये तळमजल्यात धान्य व भाजीपाला कोठार, मिरची कांडण व पिठाची गिरणी, एका तासात ८०० चपात्या तयार करण्याची यंत्रसामुग्री, भांडी धुण्याचे डिश वाॕशर यंत्रणा आदी सुविधा राहणार आहे. एकूण १२१ फूट उंच असलेल्या या भव्य वास्तुच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थ महाराजांची ५१ फुटी उंच बैठी मूर्ती उभारली जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प भाविकांच्या देणग्यांतून उभारला जात असल्याचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले. अन्नछत्र मंडळाच्या परिसराजवळ तीन एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. तेथे वाहनतळाची सोय विस्तारली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.