सोलापूर : अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आता आँनलाईन महाप्रसाद नोंदणी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाची सेवा ३६ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. नियमित महाप्रसादाचा लाभ देण्यासह एकाचवेळी पाच हजारांपेक्षा अधिक भाविकांच्या क्षमतेच्या यात्रीनिवासाची सेवाही अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. याशिवाय अनेक सामाजिक, धार्मिक,अध्यात्मिक, सांस्कृतिक उपक्रम अन्नछत्र मंडळाकडून राबविले जातात. ३० वर्षांपूर्वी किल्लारी-सास्तूर भागात झालेला महाप्रलंयकारी भूकंप असो अलिकडे करोना महासाथीच्या संकट, अशा प्रत्येक संकटांच्यावेळी अन्नछत्र मंडळाने मदतीचा हातभार लावला आहे.
हेही वाचा >>> बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…”
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी पुरेशी सोय असली तरी भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे महाप्रसादासाठी रांग लावाली लागते. यात भाविकांना वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे वेळेअभावी काही भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेणे शक्य नसते. त्याचा विचार करून अन्नछत्र मंडळाने आँनलाईन महाप्रसाद नोंदणी सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी https//www.swamiannacchatra.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. सोबत स्वतःचे छायाचित्र आणि भ्रमणध्वनी क्रमांक जोडावा लागेल. एका वेळेस जास्तीत जास्त पाचजणांची नोंदणी करता येईल. दररोज दुपारी १२.३० ते ४ आणि रात्री ८.३० ते १० या वेळेत आँनलाईन महाप्रसादाचा लाभ घेता येईल. त्यानंतर रांगेत महाप्रसाद घ्यावा लागेल, असे मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.