माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी हा सूर्याचा उत्सव. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. शनिवार, १६ फेब्रुवारीपासून २१ पर्यंत या मंदिरात रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जाणार आहे.
या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.
कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.
माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
रथसप्तमी उत्सवासाठी सजले कशेळीचे श्रीकनकादित्य मंदिर
माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी हा सूर्याचा उत्सव. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-02-2013 at 05:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri kanakaditya mandir ready for rathsaptami festival