राहाता : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान शनिवार (दि. ५) ते सोमवार (दि. ७) याकाळात ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करणार आहे. उत्सवाची तयारी पुर्ण झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. साईबाबा संस्थाकडून १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना श्रीरामनवमी उत्सवाचे निमंत्रण पाठवले आहे. मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा तसेच मंदिर परिसरात व्दारकामाई मंडळ व मुंबईतील साईभक्त कपील चढ्ढा यांनी विद्युत रोषणाई केली आहे. सौदी अरेबिया येथील साईभक्त व्यंकटा सुब्रमण्यन यांच्या देणगीतून फुलांची सजावट करण्यात येणार आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

श्री. गाडीलकर यांनी सांगितले की, श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेंव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाकरीता विविध ठिकाणच्या ८७ पालख्यांनी नोंदणी केली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शन सुखकर व्हावे, उन्हापासुन संरक्षणासाठी मंदिर परिसरात मंडप उभे आहेत. अतिरिक्त निवासव्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोबत येणाऱ्या पदयात्रींच्या निवाऱ्याची सोय मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी केली आहे. पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

उत्सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे २ लाखावर साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन आहे. लाडू पॅकेटसाठी १८० क्विंटल बुंदी व लाडु प्रसाद तयार करण्यात येणार आहे. श्री रामनवमी उत्सवासाठी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.