राहाता:शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान आयोजित श्री रामनवमी उत्सवास आज, शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात केलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यभरातून पारंपरिक वाद्यासह साईनामाच्या गजरात शेकडो पालख्या दाखल झाल्याने शिर्डी साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली.

आज पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व वीण्याची मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी वीणा घेऊन तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.

मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथ पारायणाची सुरुवात गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, दराडे यांनी व्दितीय अध्याय, भोसले यांनी तृतीय अध्याय, प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी चौथा अध्याय व विश्वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करून केली. उत्सवाच्या निमित्ताने गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

सकाळी कृष्णेंद वाडीकर (श्री क्षेत्र नृसिंहवाडी) यांचा ‘राम रंगी रंगले’, दुपारी साई आशिष (दिल्ली) यांचे साईभजन, सायंकाळी विक्रम नांदेडकर-गोरटे यांचे कीर्तन तर रात्री स्वरश्री प्रतिष्ठानचा (मुंबई) आनंदयात्री कार्यक्रम होऊन श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री शेजारती झाल्यानंतर अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले होते.

आकर्षक सजावट यंदाच्या उत्सवात साईभक्त श्री. वेंकटे सुब्रमण्यन (रियाद, सौदी अरबिया) यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्दारकामाई मंडळ व मुंबईचे साईभक्त कपील चढ्ढा यांनी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व ४ क्रमांक प्रवेशव्दाराचे आतील बाजूस केलेला श्री गजमुख गणपती देखाव्याने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील श्री साईसेवक व इतर पालखी पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. उद्या, रविवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी नित्याचे धार्मिक कार्यक्रम होतील तसेच समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील.